गुजरातच्या माजी पोलीस महासंचालकांना ३ महिन्यांचा तुरुंगवास
41 वर्षांपूर्वीच्या प्रकरणी शिक्षा
अहमदाबाद : खरा पंचनामा
गुजरातमधील एका न्यायालयाने राज्याचे माजी पोलीस महासंचालक कुलदीप शर्मा यांना तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ४१ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला.
कच्छचे पोलीस अधीक्षक असताना कुलदीप शर्मा यांनी काँग्रेसच्या एका नेत्यावर हल्ला केल्याचा आणि चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने कुलदीप शर्मा यांना दोषी ठरवलंय.
भूजचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश बीएम प्रजापती यांनी कुलदीप शर्मा यांच्यासोबतच माजी पोलीस निरीक्षक गिरीश वासवदा यांनाही दोषी ठरवलं असून तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. तक्रारदारांच्या वकिलांनी सांगितले की, कुलदीप शर्मा आणि वासवदा यांना आज न्यायालयाने दोषी ठरवलं. न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१९८४ मधलं हे प्रकरण असून काँग्रेस नेते इब्राहिम मंधारा यांच्यावर एसपी कार्यालयात कुलदीप शर्मा आणि इतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. इब्राहिम मंधारा यांचं निधन झालंय. मात्र शंकर जोशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
शंकर जोशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शहरात एका प्रकरणी चर्चेसाठी कच्छच्या नलिया शहरात इब्राहिम आणि स्थानिक आमदारांच्या प्रतिनिधींचं मंडळ ६ मे १९८४ रोजी भूज एसपी कार्यालयात तत्कालीन एसपी कुलदीप शर्मा यांच्या भेटीला गेले होते. निर्दोष लोकांना नको तर गुन्हे गारांना पकडा आणि कारवाई करा अशी मागणी त्यावेळी नेत्यांनी केली होती.
प्रतिनिधींसबोत झालेल्या वादानंतर कुलदीप शर्मा यांनी इब्राहिम यांना दुसऱ्या खोलीत नेलं. त्यांनी सहकाऱ्यांसोबत मिळून इब्राहिम यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी भूज कोर्टात तक्रार दाखल करत निवृत्त आयपीएस अधिकारी कुलदीप शर्मा आणि वासवदा यांच्यासह दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.