एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत रात्रभर खलबतं
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची शुक्रवारी रात्री भेट घेतल्याचे समोर आले आहे.
शाहांसोबत खलबतं केल्यानंतर एकनाथ शिंदे हे सकाळीच मुंबईत परतले आहेत. शिवसेनेतील बंडाच्या वेळीदेखील शिंदे यांनी शाह यांची मध्यरात्री भेटीगाठी घेत चर्चा केली असल्याचे कालांतराने समोर आले होते. अमित शाह यांच्या भेटीत राज्यातील राजकारणाबाबत चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
तीन महिन्यापूर्वीच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, सत्ता वाटपाच्या घोळामुळे सरकारच्या शपथविधीला वेळ लागला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही लांबला. महायुतीमध्ये सगळंच काही आलबेल सुरू नाही, अशाही चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची रात्री भेट घेतल्याचे समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, राज्यातील महायुतीमध्ये पालकमंत्री पद, शिवसेनेची होत असलेली कोंडी आणि ऑपरेशन टायगरबाबत चर्चा झाल्याचा अंदाज आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून तिढा आहे. रायगड, नाशिकसह काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री पदाच्या वादाबाबत एकनाथ शिंदे यांनी शाह यांच्यासोबत चर्चा केली असल्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.