'उत्पादन शुल्क'च्या कर्मचाऱ्यासह दोघांवर लाचप्रकरणी गुन्हा
तीन हजार घेताना पकडले, कराडमध्ये एसीबीची कारवाई
कराड : खरा पंचनामा
अवैध दारूविक्रीप्रकरणी तडजोड करून पुन्हा दारूविक्री सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याने सहा हजारांची लाच मागितली. त्यातील पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता त्याच्या साथीदाराकडे देताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. उत्पादन शुल्कचे कर्मचारी भीमराव शंकर माळी (वय ३७) व मुस्तफा मोहिदिन मणिवार (वय २५, रा. मलकापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली.
लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, भीमराव माळी हे कऱ्हाडच्या उत्पादन शुल्क विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अवैध दारूविक्रीप्रकरणी एकावर कारवाई केली. झालेल्या आधीच्या कारवाईनंतर निरीक्षक याने पुन्हा दारूविक्री सुरू करण्यासाठी मदत करण्याचे कबूल करून संबंधिताकडे सहा हजारांची लाच मागितली होती.
या कारवाईतील तक्रारदाराबरोबर झालेल्या चर्चेत तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याचा साथीदार म्हणून कार्यरत असलेल्या मुस्तफा मणिवार याच्याकडे संबंधिताने पहिला हप्ता म्हणून तीन हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार ती रक्कम स्वीकारताना मणिवार यांना रंगेहाथ पकडून लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.