मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने मारली उडी
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून आज एका तरुणाने उडी मारली. सुदैवाने सुरक्षा जाळीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून या तरुणाचा जीव वाचला आहे. या वेळी पोलिसांनी जाळीवर जात तरुणाला धरून सुखरूप बाहेर काढले. उडी मारण्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाचे मंत्रालयातील महसूल विभागात काम होते. जागेच्या संदर्भात आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. मात्र आपले काम होत नसल्याचे लक्षात आल्यावर इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरून त्याने थेट उडी मारली. मात्र या तरुणाचे अद्याप नाव समजू शकले नाही.
दरम्यान, पोलिसांनी पत्रकारांना या तरुणाशी संवाद साधण्यापासून देखील रोखल्याचे समोर आले आहे. यावर संतप्त पत्रकारांनी मंत्रालय पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो मात्र आम्हाला धक्काबुक्की केली जाते, असा आरोप यावेळी संतप्त पत्रकारांनी केला.
मंत्रालयात मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक असते. या बैठकीला राज्यातील सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित असतात तेव्हाच असा प्रकार घडल्याने मंत्रालय प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. सोशल मीडियावर तरुणाने मंत्रालयाच्या जाळीवर मारलेल्या उडीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.