विधान परिषदेच्या ३३% जागा अद्याप रिकाम्याच
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण संख्याबळ ७८ इतके आहे, त्यातील २६ जागा आजमितीस रिक्त आहेत. हे ज्येष्ठांचे सभागृह ३३ टक्के रिकामे असल्याचे चित्र सध्यातरी बदलण्याची शक्यता नाही.
विक्रांत पाटील, चित्रा वाघ, बाबूसिंग राठोड (भाजप), हेमंत पाटील, मनीषा कायंदे (शिंदेसेना), पंकज भुजबळ, इद्रिस नायकवाडी (अजित पवार गट) अशा सातजणांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर आधीच पाठविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
राज्यपाल नियुक्त आमदारांची एकूण संख्या १२ असते. पाच जागा अजूनही रिक्त आहेत आणि त्या लगेच भरण्यासाठी महायुतीमध्ये सध्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. भविष्यात या पाच जागा भरताना भाजपला तीन आणि अन्य दोन मित्रपक्षांना प्रत्येकी एक अशा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत सुरू होत असून, या अधिवेशनातही विधान परिषदेचे संख्याबळ हे एकूण संख्येच्या दोन तृतियांश इतकेच असेल. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या २२ पैकी तब्बल १६ जागा सध्या रिक्त आहेत. जवळपास तीन वर्षांपासून बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या सदस्यांमधून विधान परिषदेवर आमदार निवडून पाठविण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. या निवडणुका झाल्यानंतरच विधान परिषदेवर सदस्य निवडून देण्यासाठीची निवडणूक होईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.