"तुम्हाला यायचे असेल तर या, नाहीतर.."
अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या भूमिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला होता. सध्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. काल गुरुवारी (दि.६) झालेल्या सुनावणीवेळी हा खटला आपल्याला यापुढे लढायचा नसून प्रकरण बंद करावं, अशी विनंती अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. याप्रकरणाची न्या. रेवती डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी शिंदेच्या आई-वडिलांनी ही विनंती केली.
'आम्हाला हा ताण आणि धावपळ सहन होत नाही. आमची सूनही नुकतीच बाळंतीण झाली असून ती एकटीच असते. त्यामुळं आम्ही तिच्याकडं राहायला जाणार आहोत. त्यामुळं हा खटला लढायचा नाही, तो बंद करण्यात यावा', अशी त्यांनी हात जोडून विनंती केली. यावर न्यायालयाने त्यांना विचारलं की, तुमच्यावर कोणाचा दबाव तर नाही ना? त्यावर, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी आज शुक्रवार (दि.७) पुन्हा न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर पार पडली. यावेळी अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तुम्हाला यायचे असेल तर या. नाहीतर यायची गरज नाही. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, मात्र सुनावणी सुरूच राहणार आहे. आम्ही तुम्हाला बोलावले नव्हते, असे म्हणत न्यायालयाने अक्षय शिंदेच्या आई वडिलांना समजावले आहे. त्यामुळे आता अक्षय शिंदेच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी सुरूच राहणार आहे. २४ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.