Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये घट विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती जिल्हा अंतर्गत मार्गांवरील अपघात मात्र चिंताजनक

सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये घट 
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती 
जिल्हा अंतर्गत मार्गांवरील अपघात मात्र चिंताजनक



सांगली : खरा पंचनामा 

जिल्ह्यात राष्ट्रीय, राज्य मार्गांचे जाळे वाढले. त्यामुळे अपघात वाढतील असे चित्र होते. मात्र, तेथील अपघातांपेक्ष ग्रामीण भागातील असणाऱ्या जिल्हा अंतर्गत मार्गांवरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण अधिक चिंताजनक आहे. त्याच्या कारणांचा शोध घेणार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचेही त्यांनी सांगितले.

महानिरीक्षक फुलारी गेल्या पाच दिवसापासून जिल्हा दौऱ्‍यावर होते. जिल्ह्यातील सांगली, मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव पोलिस ठाण्याला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणीही त्यांनी केली. मंगळवारी पोलिस मुख्यालयात वार्षिक तपासणी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

फुलारी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात अपघातासोबत त्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात नव्याने काही राष्ट्रीय महामार्ग झाले आहे. वाहनांचा वेगही वाढला आहे. पण महामार्ग अथवा राज्य मार्गापेक्षा जिल्हा मार्ग, ग्रामीण भागातील रस्त्यावर ७० टक्के अपघात होत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते एकमार्गी असतात. त्यात हेल्मेट न वापरणे, मोबाईलचा वापर, नियमांचे उल्लंघन करणे यामुळे मृत्यूचे प्रमाणही ६५ टक्के इतके आहे. ग्रामीण भागातील अपघाताबाबत उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस दलाला केल्या आहेत.’’

अंमली पदार्थ, गांजा, गुटखा तस्करीच्या गुन्ह्यात २५ टक्के वाढ झाल्याचे कबूल करीत फुलारी म्हणाले, ‘‘पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक संवेदनशील घटना कायदेशीर पद्धतीने हाताळल्या आहेत. करजगीतील घटनेत १२ दिवसात संशयितावर दोषारोपपत्र दाखल केले. मुली, महिलांविरोधातील ९९ टक्के गुन्हे ओळखीच्या व्यक्तीकडून होत असतात. ऊस तोड मजूर पुरवठादार मुकादमावर गुन्हे दाखल केले आहे. द्राक्षे, बेदाणामध्ये फसवणूक करणाऱ्‍यावर गुन्हे दाखल करून त्याला आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. मारामारी, तोडफोड, दुखापत हे गुन्हे तत्कालीन व वैयक्तिक कारणामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर, उपाधीक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे उपस्थित होते.

महानिरीक्षक फुलारी म्हणाले,‘‘वर्षभरात शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभे करू. सायबर गुन्ह्यासह इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सीसीटिएनएस प्रणाली (क्राईम क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) या कामकाजात सांगली पोलिस दलाने राज्यात अव्वल स्थानवर आहे. ’’

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.