Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उंट सवारी' वाला तोतयेगिरीने बनला हवालदार! 'डमी'द्वारे परीक्षा उत्तीर्ण, बोटाच्या ठशाने पितळ उघडे

उंट सवारी' वाला तोतयेगिरीने बनला हवालदार! 
'डमी'द्वारे परीक्षा उत्तीर्ण, बोटाच्या ठशाने पितळ उघडे



लातूर : खरा पंचनामा 

हवालदारपदाच्या परीक्षेसाठी बनावट परीक्षार्थीला बसविले. त्यानंतर स्वतः नियुक्तीला आलेल्या युवकाची तोतयागिरी बोटाच्या ठशाने उघड केली. हा प्रकार सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना लक्षात येताच उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तोतयेगिरीने हवालदार बनलेला उंट सवारीचा व्यावसायिक असल्याचे समोर आले. 'स्टाफ सिलेक्शन'तर्फे २०२३ मध्ये हवालदार पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली होती. त्यासाठी २०२४ मध्ये लेखी परीक्षा झाली. त्यात रामेंदर रघुवीर (रा. बुढाणा जि. आग्रा) या उमेदवाराच्या नावाने अनुप या युवकाने मैदानी चाचणी, लेखी परीक्षा दिली.

या दोन्हीमध्ये तो यशस्वी झाला. त्यानंतर रामेंद्रर यांच्या नावाने नियुक्तिपत्र पाठविले गेले. त्यानुसार तो चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात दाखल झाला होता. लेखी परीक्षेवेळी घेतलेले व नियुक्तीवेळी घेतलेले बोटाचे ठसे जुळत नसल्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला.

प्रवेशपत्रावरील फोटो, परीक्षेतील हस्ताक्षराची खात्री केल्यानंतर रामेंदरने तोतयेगिरी केल्याचे लक्षात आले. त्यामुळे सीमा सुरक्षा दलातील निरीक्षक संगीतराज थॉमस यांनी येथल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेंदर रघुवीर यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

रामेंदरची चौकशी केली असता तो आग्रा येथे उंट सवारीचा व्यवसाय करीत होता. तेथे त्याची व अनुप याची ओळख झाली. भरतीप्रक्रिया पूर्ण करून नियुक्तीपत्र देण्यापर्यंत अनुपने सहा लाख रुपये घेतले, असे त्याने सांगितले. दरम्यान, संशयित अनुपचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांनी दिली आहे. उपनिरीक्षक पंकज निळकंठे तपास करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.