अटकेची कारणे लेखी द्यावी की तोंडी, हायकोर्टाचे पूर्णपीठ घेणार निर्णय
मुंबई : खरा पंचनामा
अटक होणाऱ्या आरोपीला अटकेची कारणे लेखी द्यावी की तोंडी यावर निर्णय घेण्यासाठी खास पूर्णपीठ स्थापन केले जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयारी केली जाणार आहेत. त्यानुसार पोलीस व स्थानिक न्यायालये कार्यवाही करतील. अटकेची कारणे कशा पद्धतीने द्यायला हवीत या मुद्दय़ांवर तब्बल 46 याचिका दाखल झाल्या होत्या.
न्या. सारंग कोतवाल व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने यावर निर्णय घेण्यासाठी पूर्णपीठ स्थापन करण्याची सूचना केली आहे. अटकेची कारणे लेखी द्यावी की तोंडी यासह अन्य मुद्द्यांमध्ये स्पष्टता येण्याची गरज आहे. पूर्णपीठ यावर योग्य निर्णय घेऊ शकेल, असे खंडपीठाने नमूद केले. खंडपीठाच्या सूचनेनुसार मुख्य न्यायाधीश अलोक आरधे हे तीन न्यायमूर्तीचे पूर्णपीठ स्थापन करतील.
या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पूर्णपीठासमोर सुनावणी
• पीएमएलए व यूएपीए कायद्यांतर्गत होणाऱया अटकेत अटकेची कारणे देण्यावरून दोन निकाल दिले गेले आहेत. कोणता निकाल योग्य आहे हे स्पष्ट व्हायला हवे. अटकेची कारणे लेखी द्यावी की तोंडी द्यावीत. अटकेची कारणे न दिल्याने आरोपीला जामीन मंजूर झाला अथवा त्याला सोडून देण्यात आले अशा परिस्थितीत तपास यंत्रणा त्या आरोपीला नियमांचे पालन करून पुन्हा अटक करू शकते का?
• सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या गुह्यातील आरोपीलाच केवळ अटक करण्याआधी नोटीस देणे आवश्यक आहे का? नोटीस दिल्यास आरोपी पुरावे नष्ट करू शकतो. साक्षीदारांवर दबाव आणू शकतो.
• अटकेची कारणे आरोपीला कधी द्यावीत? अटक झाल्यावर 24 तासांच्या आत, की रिमांडसाठी अर्ज केल्यावर?
अटकेची कारणे तोंडी द्यावी की लेखा, किंवा ही कारणे कधी द्यावीत याबाबत न्यायालयांनी विविध मते व्यक्त केली आहेत. अटकेची कारणे न दिल्याचे कारण सांगत आरोपीची अटकच बेकायदा असल्याचा दावा केला. कायद्यातील तरतुदीचा यासाठी दाखला दिला जातो. अशा परिस्थितीत आरोपीला जामीन मंजूर करावा लागतो अथवा त्याला सोडून देण्याचे आदेश दिले जातात. याने पीडिताचे अधिकार बाधित होतात. या सर्व मुद्दय़ांवर स्पष्टता यायला हवी. आरोपी व पीडिताचे अधिकार बाधित होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.