"आधी मी संतोष देशमुख हत्या खटला चालवण्यास नकार दिला होता, पण..."
मुंबई : खरा पंचनामा
दोन ते अडीच महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी होत होती. अखेर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य सरकारने काढलेल्या आदेशानंतर बोलताना उज्ज्वल निकम यांनी सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी आधी केस लढवण्यास नकार दिला होता, असेही सांगितले.
उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याबद्दलची माहिती दिली. या नियुक्तीनंतर पहिल्यांदाच उज्ज्वल निकम यांनी ही केस लढवण्याबद्दल भूमिका मांडली.
उज्ज्वल निकम म्हणाले, "हे प्रकरण घडल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली होती की, मी या खटल्याचं कामकाज बघावं. पण, त्यांना मी काही कारणास्तव नकार दिला होता. त्याची कारणेदेखील त्यांना विशद करून सांगितली होती."
"पुन्हा कालपासून ग्रामस्थांनी जे अन्नत्यागाचं आंदोलन केलं आहे, ते बघून मी व्यथित झालो. कारण माझ्या नियुक्तीसाठी आणि इतर काही मागण्यांसाठी त्यांनी अन्नत्यागाच्या उपोषणाला बसावं, ही निश्चित चांगली गोष्ट नाहीये. त्यांचा विश्वास सरकारवर आहे. माझ्यावर आहे, मुख्यमंत्र्यांवर आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, मी खटला चालवण्यास तयार असल्याची समंती दिली. त्याप्रमाणे त्यांनी नियुक्तीचे आदेश काढल्याचे मला माध्यमांतून कळले", असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
"मी ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो की, कायदा या देशात मोठा आहे. कायदा मोठा असल्यामुळे न्याय प्रत्येकाला मिळतोच. म्हणून माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा. या खटल्याचे जेव्हा आरोपपत्र दाखल होईल, तेव्हा हा खटला जलदगतीने चालवला जाईल, एवढंच मी आश्वासित करू इच्छितो", असे आवाहन उज्ज्वल निकम यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांना केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.