Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ड्रग्ज मुक्त युवा पिढीसाठी कोथरुडकरांचा शंखनाद अमली पदार्थाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

ड्रग्ज मुक्त युवा पिढीसाठी कोथरुडकरांचा शंखनाद
अमली पदार्थाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा



पुणे : खरा पंचनामा

ड्रग्जमुक्त युवा पिढीसाठी मंगळवारी शिवाजी रायगड स्मारक मंडळ, अंकुर प्रतिष्ठान, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद, अग्रेसर भारत आदी संघटनांच्या वतीने कोथरुड मधील हुतात्मा राजगुरू चौक येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये कोथरुडकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अमली पदार्थ विरोधात शंखनाद केला. यामध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी लढा तीव्र करण्यासाठी अमली पदार्थ विक्रीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. तसेच, व्यसनाधीन व्यक्तींना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. तसेच, झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण असल्याची भूमिका पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी यावेळी मांडली.


यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील नागरिकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या अमली पदार्थ विरोधी चळवळीत सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. सांगली सारख्या जिल्ह्यातही अमली पदार्थांचे साठे जप्त होत आहेत. त्यामुळे सांगलीचा पालकमंत्री नात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती पुरविल्यास त्यास वैयक्तिकरीत्या रक्कम रूपये १० हजारांचे बक्षीस दिले जात आहे. कोथरुड मध्येही अमली पदार्थांची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करणाऱ्यास बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. 

अमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा मिळू देणार नाही, असा स्पष्ट इशारा देऊन ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मला प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता. पण मी कुठेही मागे हटलो नाही, अशी आठवण त्यांनी करुन दिली. तसेच, व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी लोकसहभागातून कोथरुड मध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 

यावेळी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी अमली पदार्थ ही आपल्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपस्थित सर्वांनी अमली पदार्थ विरोधासाठी शपथ देखील घेतली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.