प्रशांत कोरटकरच्या मोबाईलवरूनच इंद्रजित सावंत यांना धमकी
सीडीआरमधून मोठा खुलासा !
कोल्हापूर : खरा पंचनामा
इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संशयित प्रशांत कोरटकर याच्या मोबाईलचा कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) तपासला असून, या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरनेच आपल्या मोबाईलवरून इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी काढलेल्या CDRमधून प्रशांत कोरटकरने 9764****** या क्रमांकावरून इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे. धमकी देताना त्याने आवाज बदलल्याचा दावा केला जात होता, मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. या प्रकारानंतर कोरटकर फरार झाला असून, त्याच्या गायब होण्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात नागपुरातील बेलतरोडी पोलिस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर सकल मराठा समाज आक्रमक झाला असून, कोरटकरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याआधी कोल्हापुरात देखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कोल्हापूर पोलिसांचे पथक मागील दोन दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून असून, त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आणि सावंत यांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकीच्या अनुषंगाने करण्यात आली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा माहिती संकलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. चौकशीदरम्यान फॉरेन्सिक विभागाने इंद्रजित सावंत यांच्या मोबाईलमधील प्रशांत कोरटकर यांच्यासोबत झालेल्या संवादाची तपासणी केली, तसेच सावंत यांच्या आवाजाचे नमुनेही तपासणीसाठी घेतले.
कोरटकरचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी बेलतरोडी पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार केली आहेत, जी संशयित भागात शोध घेत आहेत. हे पथक मध्य प्रदेश, मुंबई आणि इंदूर या ठिकाणी तपास करत आहे. याशिवाय सायबर क्राईम पोलीसही कोरटकरच्या डिजिटल हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. कोल्हापूर पोलिसांनी देखील त्याला शोधण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.