खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची का नाही? ब्राह्मण आहे म्हणून का?
मुंबई : खरा पंचनामा
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतिश भोसले उर्फ खोक्याला अटक करताच त्याची कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच त्याच्या घरावरही वनविभागाने बुलडोझर फिरवला आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
तर दुसरीकडे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करुन धमकी दिल्यानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याबद्दल प्रशांत कोरटकरविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मात्र, अद्यापही पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केली नाही, तसेच त्याची कार देखील जप्त केली नाही. त्यामुळे पोलिसांकडून कारवाईमध्ये दुजाभाव केला जात असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट प्रश्न विचारला आहे. प्रशांत कोरटकर ब्राह्मण आहे म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही का? असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
बीडच्या लढ्यामुळे एक महत्वाचा विषय माझ्याकडून राहिला. तो म्हणजे प्रशांत कोरटकरांचा. मी दीपक केदार यांना ओळखत नाही, पण त्यांचे जे विधान त्यांनी माध्यमांपुढे केले ते योग्य आहे, असे म्हणत अंजली दमानिया यांनी केदार यांचे समर्थन करत प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
जर सतीश भोसलेवर कारवाई होते, त्याची गाडी जप्त होते. मग प्रशांत कोरटकर ज्यांनी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली, त्यांना फरार होऊ दिले जाते, त्यांची Rolls Royce कार जप्त होत नाही. जप्त तर सोडा, ती कुठून आली त्याची चौकशी देखील का होत नाही, ते ब्राह्मण आहेत म्हणून?, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. तसेच, हा जातीवाद बंद झाला पाहिजे, सेलेक्टिव अॅक्शन घेणे साफ चुकीचे आहे, आणि हे बंद झाले पाहिजे, असेही अंजली दमानिया यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.