कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे
शोषण धक्कादायक : ज्योती आदाटे
घरेलू कामगार संघटनेच्यावतीने महिलादिनानिमित्त कार्यक्रम
सांगली : खरा पंचनामा
घरेलू कामगार चळवळ ही काळाची गरज आहे कारण महिलेचा घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणी होणारे शोषण धक्कादायक आहे. या शोषणाला वाचा फोडायची असेल तर महिलांची एकजूट असणे आवश्यक आहे. तसेच महिलांनी आत्मनिर्भर असले पाहिजे. आपला स्वाभिमान कधीही गमावू न देता प्रामाणिकपणाची कास धरून आपले कार्य पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव ज्योती आदाटे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटना व सेवासदन कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महिलांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणे घडविले पाहिजे. मुलींना लहानपणापासूनच लाजणे आणि खाली मान घालून जगण्यापेक्षा ताठ मानेने जगायला शिकवले पाहिजे. मुली वयात आल्या की त्यांची लग्ने घाईघाईने उरकली जातात. त्यामुळे त्यांचे आयुष्य बरबाद होते. लग्नाअगोदर मुलींना स्वतः च्या पायावर सक्षमपणे उभे केले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात महिला अनेक अंधश्रद्धा जोपासत असतात. त्यामुळे आपली पुढची पिढी अज्ञानी अंधश्रद्धाळू बनत जाते. हे फारच घातक आहे. त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवहार केले पाहिजे त्यामुळे तेच आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होऊन पुढची पिढीपण सुजाण तर्कनिष्ठ विचार करणारी बनेल.
यावेळी घरेलू कामगार संघटनेचे समन्वयक किरण कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आंबेडकर शेती संशोधन केंद्राचे प्रमुख ललीत बाबर, विद्रोहीचे दिगंबर कांबळे, प्रा.वासुदेव कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सेवासदन फौंडेशनच्या समन्वय मीनाक्षी कोळी, शबाना शेख, प्रणाली कोळी, अंनिसची संघटक प्रियांका तुपलोंडे, सहदेव कांबळे, लक्ष्मी सोनंद, कस्तुरी कोळी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.