"न्यायालय काय म्हणतंय? न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत? यावर पुढची भूमिका ठरेल"
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून दिशाची हत्या झाल्याचा दावा केला आहे.
शिवाय त्यांनी आदित्य ठाकरेंचाही उल्लेख केल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधिमंडळाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी खडाजंगी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
दिशा सालियनच्या वडिलांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केले आहेत. १४व्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर एकही जखम कशी झाली नाही? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या आधारावर दिशानं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या वकिलांनी यात थेट आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व सूरज पांचोली यांची आरोपी म्हणून नावं घेत खळबळ उडवून दिली आहे.
सतीश सालियन यांच्या पत्रकार परिषदेपासून आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी गुरुवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांची भूमिका मांडली. "हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात त्यांच्या आरोपांवर जे काही उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ. पण इतर मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या मुद्द्यावर त्यांना सभागृह बंद पाडायचं असेल तर खुशाल पाडावं. पण मी मुद्द्यावर बोलत राहणार", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्ट केलं आहे. "ही सगळी चर्चा कोर्टाच्या केसमुळे सुरू झाली. उच्च न्यायालयात एका वकिलानं याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनीही एक मुलाखत दिली आहे. शासनाची भूमिका यासंदर्भात पक्की आहे. न्यायालय काय म्हणतंय? न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत? यावर पुढची भूमिका ठरेल", असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
"आत्तातरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय नाही. न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल. आत्तातरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत", असं ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.