Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ग्रंथालय विभागाने डिजिटायझेशनवर भर द्यावा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालय विभागाने डिजिटायझेशनवर भर द्यावा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : खरा पंचनामा

उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय,पुणे यांच्या वतीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजनांविषयी दोन दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन करुन कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राज्यातील ग्रंथालयांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सदैव कटिबध्द असून ग्रंथालय विभागाने डिजिटायझेशनवर भर देण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. 

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्यावत करण्यात येणार आहेत तसेच राज्यातील शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्व अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले की, समाज माध्यमांच्या युगात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असून शासकीय व खासगी ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन करून वाचकांना ऑनलाईन पुस्तके उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ग्रंथालयांचे अनुदान वाढवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ११,१५० ग्रंथालये कार्यरत असून ग्रंथालयाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे ग्रंथांचे आद्यवतीकरण कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. सांताक्रुज कलिना कॅम्पस येथे राज्याचे शिखर ग्रंथालय राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची अतिशय देखणी इमारत तयार होत असून, या ठिकाणीही वाचकांसाठी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खासदार व आमदार निधीतून काही पुस्तक खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्‍याच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे अजय प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, अपर्णा वाईकर, अमित सोनवणे,श्रीनिवास मंगलपल्ली यांच्यासह ग्रंथमित्र धोंडीबा सुतार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे मोहन महाराज शिंदे, कोल्हापूरचे डॉ. सुशांत मगदूम यांच्यासह सर्व जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व विभागातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.