Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषीएपीआय अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी
एपीआय अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण 

ठाणे : खरा पंचनामा

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. त्याच्यासह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पाटील दोषी ठरले आहेत. तर राजेश पाटील उर्फ राजू पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींना ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. या निकालाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह राज्यातील पोलिसांचे लक्ष लागून राहिले होते.

आरोपी नंबर १ अभय कुरुंदकर याला कलम ३०२ अंतर्गत खून प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी नंबर २ राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी नंबर ३ कुंदन भंडारी आणि आरोपी नंबर ४ महेश फळणीकर या दोघांना कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सरकारच्या वतीने अॅड. प्रदीप घरत यांनी काम पाहिले. पनवेलच्या सहायक पोलीस उपायुक्त तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. तब्बल ९ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरूंदकर दोषी ठरला आहे.

अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या मीरा रोड येथील फ्लॅटवर अश्विनी बिद्रेचा अमानुष खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे वूडकटरने लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिल्याचाही त्याच्यावर आरोप होता.

खुनात कुरुंदकरने राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची मदत घेतली होती. ७ डिसेंबर २०१७ मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली.

राजेश पाटील यास १० डिसेंबर २०१७ मध्ये जेरबंद केले. दोन्हीही आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी कुंदन भंडारी व महेश फळणीकरला अटक केली होती. अश्विनी बिद्रे-गोरे या सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत होत्या. हातकणंगले तालुक्यातील आळते हे त्यांचे मूळचे गाव. सामान्य घराण्यातून वरिष्ठ पोलिस पदाधिकारीपदावर पोहोचलेल्या अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाने जिल्हा हळहळला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.