अशी काय मैत्री होती की मुख्यमंत्री स्वतःच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाही?
नाशिक : खरा पंचनामा
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सीआयडीच्या दोषारोप पत्रासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरल्याचे पाहायला मिळाले.
विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. संतोष देशमुख प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
नाशिकमध्ये आज (दि. 16) शिवसेना ठाकरे गटाचे एक दिवसीय निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्र कुठे चाललाय? या विषयावर भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, बीड आणि परभणीचे प्रकरण झाले. बीडचा आका कोण आहे? हे सर्वांना माहिती आहे. हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, अशी काय मैत्री होती की मुख्यमंत्री स्वतःच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाही? भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या झाली आणि त्याला न्याय देता आला नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून न्याय मागणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकावरुनही आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने वक्फ कायदा आणला. भाजपच्याच नेत्यांची भाषणे ऐकली तर भाजपचे लोक हिंदूंच्या विरोधात आहे हे कळेल. वक्फमुळे कोणाला फायदा होणार नाही. निवडणुकीआधी सिद्धिविनायक मंदिर वक्फ अंतर्गत जाणार, अशी अफवा पसरवली होती, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, गेली 18 वर्ष सरकार पंतप्रधान भाजपचे असताना रोहिंगे-बांगलादेशी घुसले कसे? ज्या एआयडीएमकेने वक्फला विरोध केला, त्यांच्या सोबतच भाजपने युती केली आहे. मग हिंदुत्व कोणी सोडले? जे गँगवॉर बाळासाहेब ठाकरे यांनी संपवले होते, त्याच मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा गँगवॉर सुरू झाले आहेत. खून, बलात्कार कोणाच्या काळात सुरू झाले? यांच्यासारखे गृहमंत्री बघायला मिळतील का? राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही? अशी परिस्थिती असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.