वाल्मिक कराडसह आरोपींची संपत्ती जप्त करा
सरकारी पक्षाचा न्यायालयात अर्ज
बीड : खरा पंचनामा
संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी गुरुवारी बीडच्या विशेष 'मकोका' न्यायालयामध्ये पार पडली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने वाल्मीक कराडसह आरोपींची संपत्ती जप्त करावी, या मागणीचा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला.
तर दुसरीकडे हे आरोप मला मान्य नाहीत, असा अर्ज म्हणजेच डिस्चार्ज अॅप्लिकेशन वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयात सादर केले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात न्यायाधीश व्यंकटेश पाटवतकर यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. उज्वल निकम यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. विकास खाडे, सचिन शेप यांनी बाजू मांडली. न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये घडलेल्या बाबीविषयी उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. यामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी मागितलेली यामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी मागितलेली कागदपत्रे न्यायालयात देण्यात आली. तसेच, आरोपीच्या वकिलांना देखील देण्यात आली आहेत. या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराड याने माझ्या विरोधात पुरावा नाही मला दोष मुक्त करा, असा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यात आला आहे. आता या सर्व बाबीवर २४ तारखेला आरोपीचे म्हणणे मांडले जाईल. याबरोबरच वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी म को का कायद्याअंतर्गत न्यायालयात अर्जाद्वारे करण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले. तसेच विष्णू चाटे सध्या लातूर येथील तुरुंगामध्ये आहे, त्याला बीड येथील कारागृहात हलविण्यात यावी, अशी मागणी विष्णू चाटेच्या वकिलांनी केली आहे. यावर देखील सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानंतर कार्यवाही होऊ शकणार आहे.
दरम्यान, सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुनावणीवेळी आम्ही काही कागदपत्रे मागितली होती. त्या कागदपत्रांची काही पूर्तता झाली आहे. काही पूर्तता येत्या काही दिवसात होईल. आरोपी नंबर एक वाल्मिक कराड याच्या माध्यमातून डिस्चार्ज अॅप्लिकेशन दाखल केलेला आहे. त्यावर पुढील तारखेस सुनावणी होईल. या प्रकरणातील काही पुरावे आता फॉरेन्सिक लॅबमधून न्यायालयात जमा झाले आहेत, ते आम्हाला देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रॉपर्टी अटॅचमेंट संदर्भात तपास यंत्रणेमार्फत अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर आरोपींचे म्हणणे सादर केले जाईल. पुढील सुनावणी पर्यंत चार्ज फ्रेम होईल, असे वाटत नाही. आमच्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनवर सरकारी पक्षाचे म्हणणे येईल. त्यानंतरच याबाबतचा निर्णय होऊ शकेल, असे विकास खाडे यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.