शिरोलीत कंटेनर, ट्रॅव्हल्स, कारचा विचित्र अपघात एक ठार, 15 जखमी, दोघे गंभीर
कोल्हापूर : खरा पंचनामा
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे खासगी ट्रॅव्हल्स बसने थांबलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रॅव्हल्समधील एक जागीच ठार झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना कोल्हापूर येथील सीपिआर रुग्णालयात व काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी ट्रॅव्हल्सलाही पाठीमागून कारची धडक बसली हा विचित्र अपघात आज शनिवारी सकाळी 7च्या सुमारास झाला. याची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
सौरभ ऊर्फ रोहन अजित कुलकर्णी (वय 30, रा. खडकलाट, चिकोडी) असे या अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर प्रवीण भैरू पुमनाचे (वय 33, निपाणी), संदीप शंकरराव चलमले (वय 53), नारायण वाट्लेकर (वय 23), महेश पाटील (वय 30), ऐश्वर्या गुडकर (वय 26), सोनाली मोरे (वय 02), देवराज मोरे (वय 28), स्वदेश देसाई (वय 25) अशी जखमीची नावे आहेत. यातील अन्य जखमीची नावे समजू शकली नाहीत.
नाकोडा कंपनीची ट्रॅव्हल बस (क्र. एम एच 09 जी जे 6759) ही पुण्याहून बेळगावकडे 36 प्रवासी घेवून निघाली होती. चालक संदीप शंकरराव चांगभले (वय 54 रा. हरीनगर निपाणी) बस चालवत होता. ही बस शिरोली औद्योगिक वसाहत येथील मेनन पिस्टन्स कंपनीसमोर अन्य एका वाहनास ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या बाजूस चाकातील हवा कमी झाल्याने थांबलेल्या मालवाहू कंटेनर (क्र. एम एच 46 ए आर 5182) ला जोराची धडक दिली. यामध्ये ट्रॅव्हल्सचा क्लिनर सौरभ कुलकर्णी हा जागीच ठार झाला. ट्रॅव्हल्स जागीच थांबल्याने मागून येणारी कार (क्र. एम एच 50 यु 3765) ही ट्रॅव्हल्सला धडकली.
कार चालक राजेश भिमराव सुतार (वय 46 रा. संभूर ता. पाटण, जि. सातारा) हे सरनोबतवाडी येथील कॅन्सर हाॅस्पिटला किसन जाधव या पेशंटना घेवून जात होते हि धडक होताच इको कारमधील दोन एअर बॅग उघडल्याने कार चालक व बाजूस बसलेला पेशंटचा मुलगा महेश जाधव व पेशंट हे तिघे बचावले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.