गजा मारणेला पुणे पोलिसांचा आणखी एक दणका
2 फॉर्च्यूनरसह एकूण 8 गाड्या ताब्यात
पुणे : खरा पंचनामा
सांगली कारागृहात ठेवण्यासाठी कुख्यात गँगस्टर गजा मारणे याला नेत असताना सातारा येथील कणसे ढाब्यावर झालेल्या मटण पार्टीवर कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांनी गजा मारणे याला आणखी एक दणका दिला आहे.
मारणे ला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा पाठलाग करणाऱ्या चार आलिशान गाड्या पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहे. कोथरुड येथील मारहाण प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी २ फॉर्च्यूनरसह चार गाड्या जप्त केल्या होत्या.
कोथरुड येथील आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी गजा मारणे याच्यासह ६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सांगली कारागृहात ठेवण्यासाठी पोलीस व्हॅनमधून नेले जात होते. याची माहिती बंदोबस्तावर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक व इतरांनी मारणे समर्थकांना दिली. त्यामुळे त्यांनी या पोलीस व्हॅनचा पाठलाग केला. सातारा येथील कणसे ढाबा येथे जेवणास थांबले असताना पुणे, सातारा, सांगली येथील गुंडांनी मारणे याची भेट घेतली. मारणे याला मटण पार्टी देण्यात आली. याची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले. तेथील सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सांगितले की, गजा मारणे याला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा पाठलाग करणाऱ्या ६ ते ७ गाड्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्या आहेत. त्यांची माहिती काढून त्यापैकी ४ चार चाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अन्य वाहनांचा शोध घेतला जात आहे.
आय टी इंजिनिअरला मारहाण करताना झालेल्या गुन्ह्यात वापर करण्यात आलेल्या २ फॉर्च्यूनरसह ४ गाड्या पोलिसांनी या गुन्ह्यात अगोदरच जप्त केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत एकूण ८ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.