इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
इचलकरंजी : खरा पंचनामा
शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. त्यांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण पार पडले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली.यात 130.60 कोटी रुपयांच्या केंद्र सरकार पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना (UIDSSMT) अंर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व शहापूर भागासाठी भुयारी गटार योजना राबविणे व 18 द.ल.लि. क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, 488.67 कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाभियान अंतर्गत अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचे उद्घाटन, 31.37 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणे, पंपिंग मशीन तसेच दाबनलिका टाकणे इ. कामांचे उद्घाटन, 59 कोटींच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 10 रस्ते कामांचे भूमिपूजन, 4 कोटींच्या शहापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन, तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उप विभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगुले उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री व जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा भेट दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.