नीरज चोप्रानं इतिहास रचला!
90.23 मीटर भाला फेकत नव्या विक्रमाची नोंद
दिल्ली : खरा पंचनामा
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीग स्पर्धेत वैयक्तिक विक्रम रचला आहे. नीरजनं 90.23 मीटर भाला फेकत वैयक्तिक विक्रमाची नोंद केली. नीरज चोप्राला आतापर्यंत 90 मीटरचा टप्पा पार करता आला नव्हता. आजच्या स्पर्धेत त्यानं हा टप्पा पार केला.
नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 88.44 मीटर भाला फेकला. तर, दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला, त्याचा प्रयत्न बाद ठरला. नीरज चोप्रानं तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रानं त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा 90 मीटरचा टप्पा पार केला आहे. भाला फेकमध्ये 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची देखील नोंद झाली आहे.
नीरज चोप्रानं चौथ्या प्रयत्नात 80.56 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नापर्यंत पहिल्या स्थानावर होता. तर जुलियन वेबर 89.06 मीटरच्या भालाफेकीसह दुसऱ्या स्थानावर होता. जुलियन वेबरनं पाचव्या प्रयत्नात 91 मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकला यामुळं नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर गेला. जुलियन वेबरनं 91.06 मीटर भाला फेकला.
दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रासमोर अँडरस पीटर्स (ग्रेनाडा), जेकब वाडलेच (झेक प्रजासत्ताक), ज्युलियन वेबर मॅक्स डेहनिंग (दोघेही जर्मनी), जुलियस येगो (केनिया), रॉड्रिक डीन (जपान) यांचं आव्हान आहे. पॅरिस ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम यानं दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग घेतला नाही.
नीरज चोप्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी यापूर्वी 89.94 मीटर होती. त्यानं ही कामगिरी 2022 मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये केला होता. नीरज चोप्रानं 2018 मध्ये दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग घेतला होता, त्यावेळी तो चौथ्या स्थानावर राहिला होता. 2023 मध्ये तो पहिल्या स्थानावर होता तर 2024 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला होता.
दोहा डायमंड लीगमध्ये पहिल्या स्थानावर राहणाऱ्या अॅथलीटला 8 अंक मिळतात. दुसऱ्या स्थानावर राहणाऱ्या खेळाडूला 7 तर तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या खेळाडूला 6 गुण मिळतात. चौथ्या स्थानावरील खेळाडूला 5 गुण तर डायमंड लीग 2025 चा समारोप 27 आणि 28 सप्टेंबरला ज्यूरिख डायमंड लीगच्या फायनल सोबत होणार आहे.
नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये केलेली कामगिरी त्याच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला याचा फायदा होईल. नीरज चोप्रानं 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला सोशल मीडिया ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तरी देखील त्यानं चांगली कामगिरी करुन दाखवली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.