Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

यंदाचा ‘ग्लोबल पुलोत्सव‘ ९ जूनपासून रंगणार... पुलोत्सवातील पुलंच्या साहित्यावर ५० टक्के सवलत : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

यंदाचा ‘ग्लोबल पुलोत्सव‘ ९ जूनपासून रंगणार... 
पुलोत्सवातील पुलंच्या साहित्यावर ५० टक्के सवलत : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : खरा पंचनामा

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु.ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतीदिन आणि सुनिता देशपांडे  यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु.ल. परिवाराच्या सहयोगाने अव्याहतपणे चालू असलेला आणि करोना काळात बंद पडलेला ‘ग्लोबल पुलोत्सव‘ पुन्हा सुरू करण्यात येत असून दिनांक ९ ते १२ जून २०२५ या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर कलादालनआणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे या महोत्सवाचा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. अशी माहिती महोत्सवाचे निमंत्रक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.चे सुशील जाधव,  महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदारयांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या आभा औटी, बेलवलकर हाउसिंगचे समीर बेलवलकर, कार्टुनिस्ट कंबाईनचे चारुहास पंडित आदी उपस्थित होते. 

या पत्रकार परिषदेत यंदाचा पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना, पु.ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ चित्र-नाट्य रंगकर्मी सई परांजपे यांना, विशेष सन्मान स्व. प्रभा अत्रे यांना, तर पु.ल. कृतज्ञता सन्मान चिंतामणी हसबनीस यांना प्रदान केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्याच्या प्रवेशिका शनिवार दिनांक ७ जूनपासून सकाळी ९.०० ते ११.३० आणि संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळात बालगंधर्वच्या तिकीट खिडकीवर मिळणार आहेत. ‘कोहिनूर ग्रुप‘ प्रस्तुत व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.आयोजित ग्लोबल पुलोत्सवाला स्किन सिटी, बेलवलकर हाउसिंग, लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन , प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स तसेच कार्टुनिस्ट कंबाईन , महाराष्ट्र साहित्य परिषद ( व एन.एफ.डी.सी. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी माहिती दिली कि, येथे पुलंच्या साहित्याचा एक वेगळा स्टॉल असेल जिथे त्याची पुस्तके हि ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. जेणेकरून पुलंच्या साहित्याच्या खरेदीची विक्रमी नोंद करण्याचा प्रयत्न येथे असेल. यासोबतच असा एक निर्णय झाला कि कोरोनासारखी जरी परिस्थिती निर्माण झाली तरी पुलोत्सव हा ऑनलाईन पद्धतीने का होईना पण घेतला जावा. पुलोत्सवामध्ये खंड पडू द्यायचा नाही असा एक निर्णय यावेळी पाटील यांनी जाहीर केला. 

या ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे उद्घाटन सोमवार दिनांक ९ जून रोजी संध्याकाळी ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे स्व. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी‘ संस्थेस विशेष पु.ल. पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी स्व. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी’तर्फे सांगितिक सादरीकरण होणार आहे. पुलंची पुस्तके आणि दृक-श्राव्य साहित्याचा समावेश असलेल्या ‘पुस्तकवाला‘ यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील यानिमित्त होणार आहे. यानंतर रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ५० कलाकारांचा सहभाग असलेला ‘जावे पुलंच्या गावा‘ हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर होणार आहे.

मंगळवार दिनांक १० जून रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व कलादालन येथे महाराष्ट्रातील १०० व्यंगचित्रकारांनी पु.ल. आणि त्यांच्या साहित्यास समर्पित केलेल्या व्यंगचित्रांच्या आणि चिंतामणी हसबनीस यांच्या ब्रेल चित्रांच्या खास प्रदर्शनाचे उद्घाटन नाबाद शंभरीतील ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीसयांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लबप्रस्तुत सुधीर मोघे दिग्दर्शित ‘या सम हा या पुलंवरील चित्रपटाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. यानंतर दुपारी २.०० वाजता एन.एफ.ए.आय. थिएटर येथे लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुलंनी ‘ती फुलराणी’ हे अजरामर नाटक ज्या चित्रपटाने प्रेरीत होवून लिहिले तो ‘पिग्मेलियन‘   हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

यानंतर संध्याकाळी ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात जगविख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पुलोत्सव जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी ७.०० वाजता उस्ताद अमजद अली खान यांच्याशी चित्रपट दिग्दर्शक मकरंद ब्रम्हे  प्रकट संवाद साधणार आहेत. रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘गोष्टी तिकडच्या‘  हा पुलंवरील विशेष दृक-श्राव्य कार्यक्रम वंदना बोकील कुलकर्णी , मधुराणी प्रभूलकर  , गिरीश कुलकर्णी  , गौरी देशपांडे  आणि पार्थ उमराणी  सादर करणार आहेत.

बुधवार दिनांक ११ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व कलादालन येथे ‘पुलंचा विनोद: समकालीन का सर्वकालीन?’  या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये रेखा इनामदार साने , रामदास फुटाणे  , चारुहास पंडीत, श्रीकांत बोजेवार  सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी प्रा. मिलिंद जोशी  संवाद साधणार आहेत. दुपारी २.०० वाजता एन.एफ.ए.आय. लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवात पुलंनी ’एका कोळियाने‘  हे गाजलेले पुस्तक ज्या चित्रपटाने प्रेरीत होवून लिहिले तो चित्रपट : ‘द ओल्ड मॅन अँड द सी‘  दाखविण्यात येणार आहे.

संध्याकाळी ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात चिंतामणी हसबनीस यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुलोत्सव कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी ७.०० वाजता चिंतामणी हसबनीस यांचे सप्रयोग व्याख्यान होणार असून त्यांच्याशी डॉ. मंदार परांजपे  संवाद साधणार आहेत. रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ३५ कलाकारांनी सादर केलेला ‘मॅड सखाराम + मराठीचा गाळीव इतिहास‘ हा नाट्याविष्कार सादर होणार आहे.

गुरूवार दिनांक १२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व कलादालन येथे ‘सर्जनशील सहजीवन : पु. ल. आणि सुनिताबाई’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये दिनेश ठाकूर , डॉ. मंदार परांजपे, सतीश पाकणीकर  सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी मंगला गोडबोले  संवाद साधणार आहेत. दुपारी २.०० वाजता एन.एफ.ए.आय. येथे लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवात पुलंनी प्रभावित होवून जे ‘सुंदर मी होणार‘ हे नाटक लिहिले तो ‘द बॅरेट ऑफ विंपॉल स्ट्रीट‘ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

संध्याकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि कलाकार सई परांजपे यांना एन.एफ.डी.सी.चे संचालक प्रकाश मगदूम यांच्या हस्ते पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळी ७.०० वाजता सई परांजपे यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.