इंदापूरचे बेपत्ता पोलीस हवालदार अखेर सापडले !
इंदापूर : खरा पंचनामा
गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असलेले इंदापूरचे पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांचा अखेर छडा लागला आहे. ते बेपत्ता झाल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
केमदारणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या सह पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या वरती गंभीर आरोप देखील केले होते.
अखेर पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांना शोधण्यात पोलिसांना यश आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विष्णू केमदारणे यांना पुण्यामधून शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांना त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलं जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी विष्णू केमदारणे यांचा त्यांच्या पत्नीला फोनवरून संपर्क झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने ही गोष्ट इंदापूर पोलिसांना कळवली आणि त्यानंतर पोलिसांनी लोकेशन ट्रेस करत पुण्यातील आळंदी परिसरातून पोलीस हवालदार विष्णू केमदारणे यांना शोधून काढल्याची माहिती आहे.
विष्णू केमदारणे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कोकणे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये ते मदारणे याला समजावून सांग त्याला गाडून टाकीन, असं एका पोलीस कर्मचाऱ्याला सांगत होते. त्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनले.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. तुझी नोकरी आणि यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं या चिठ्ठीत केमदारणे यांनी लिहिले होते. माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी या चिठ्ठीत केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.