इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
मावळ : खरा पंचनामा
मावळ तालुक्यात आज एक मोठी दुर्घटना घडली असून, कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३० पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे घडली. रविवार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होती. याच गर्दीत काही पर्यटक पुलावर थांबले असताना अचानक पूल कोसळला आणि अनेक जण थेट नदीत पडले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असून बचावकार्यात अडथळे येत आहेत.
दरम्यान, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी रवाना झाले असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेबाबत अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.