Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रभाग रचनेला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, महानगरपालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतर

प्रभाग रचनेला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, महानगरपालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतर

मुंबई : खरा पंचनामा

राज्य सरकारने महापालिका निवडणुकांची प्रभागरचना तयार करण्यासाठी जवळपास महिनाभराची मुदतवाढ दिल्याने आता महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका आता दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नव्या वेळापत्रकानुसार मुंबईसह अ, ब, क वर्गीय महापालिकांना ६ ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे; तर ड वर्ग महापालिकांची प्रभाग रचना १३ ऑक्टोबरपर्यंत अंतिम होईल. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने राज्यातील स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली तीन वर्षे रखडल्या होत्या.

२९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या आरक्षणाप्रमाणे निवडणुका घेण्यास सांगत चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर आयोगाने राज्य सरकारला तातडीने प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले होते.

त्यानुसार राज्य सरकारने १० जून रोजी प्रभाग रचना तयार करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती; तर १२ जून रोजी प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला होता. त्यावेळीही प्रभाग रचना करण्यासाठी सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र आता प्रभाग रचना तयार करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

या वेळापत्रकानुसार मुंबईसह राज्यातील अ, ब, क वर्ग महापालिकांच्या प्रभाग रचनेचे नव्याने वेळापत्रक आखण्यात आले आहे. त्यानुसार १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान महापालिका आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर करतील. ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान हे प्रस्ताव नगर विकास विभाग राज्य निवडणूक आयोगाला सादर करेल.

या प्रारूप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर महापालिका आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेवर २२ ते २८ ऑगस्टदरम्यान हरकती व सूचना मागवतील. या हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन १५ सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचना अंतिम करून त्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाला पाठवण्यात येईल. या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन जास्तीत जास्त ६ ऑक्टोबरपर्यंत ही प्रभाग रचना अंतिम करण्यात येईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.