Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही कोल्हापूरच्या नव्या एसपिंचा आदेश

विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही 
कोल्हापूरच्या नव्या एसपिंचा आदेश

कोल्हापूर : खरा पंचनामा

विशाळगडवर कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असा आदेश कोल्हापूरचे नवीन जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी दिला आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते.

या कारणाने जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आधी हायकोर्टाने विशाळगडवर ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती. त्याला प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने विशाळगडवर बकरी ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती. त्या आधी उरुसावेळी फक्त स्थानिकांना कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती. यंदाच्या बकरी ईदला स्थानिक तसेच भक्तानांही कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

विशाळगड बकरी ईद कुर्बानी प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यात यावी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कोल्हापूर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. विशाळगडवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण त्यामागे देण्यात आलं होतं.

सर्वोच्च न्यायालयात या आधीच्या घटनांचाही संदर्भ देण्यात आला होता. परंतु या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला.

गेल्यावर्षी बंद आवारात कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली होती. यावर्षी संरक्षित स्मारकात उरुस 12 तारखेपर्यंत सुरू राहील. या संदर्भातील प्रकरण दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला.

कोणताही धर्म किंवा श्रद्धा असो, संरक्षित स्मारकात काहीतरी गतिविधी सुरू असतात आणि त्या ठीक आहेत असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

गेल्या वर्षी 14 जुलै रोजी विशाळगडवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन दंगल घडली होती. त्यानंतर काही काळ या गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली. नंतरच्या काळात या ठिकाणी कुर्बानी देण्यावरही नियंत्रण आलं. गेल्या वर्षी विशाळगडवर जो उरुस झाला त्यावेळी फक्त स्थानिकांनाच कुर्बानी देण्याची परवानगी देण्यात आली होती.

आता हायकोर्टाने या ठिकाणी कुर्बानीला परवानगी दिली असली तरी कोल्हापूर पोलिसांनी मात्र त्यावर वेगळी भूमिका घेतली आहे. विशाळगडवर कोणताही सण किंवा उत्सव साजरा करता येणार नाही असा आदेश कोल्हापूर पोलिसांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.