सांगलीतील भाजी विक्रेत्याच्या खूनप्रकरणी दोघांना अटक
वडिलांच्या खुनाचा तसेच नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाच्या रागातून केला गेम : सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावर भाजी विक्रेत्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. वडिलांचा खून केल्याचा तसेच नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून हा खून केल्याची कबुली दोघांनी दिल्याची माहिती शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
मुजाहिद फिरोज ऊर्फ बड़े शेख (वय २४, मुळ रा. इंदिरा नगर मालगाव रोड, मिरज, जि. सांगली सध्या रा. साई मंदीरजवळ, संजयनगर, सांगली), जय सुरज पाटील (वय २१, मूळ रा. इंदिरा नगर, मालगाव रोड, मिरज, जि. सांगली सध्या रा. साई मंदीरजवळ, संजयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवार दि. 5 मे रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास शंभर फुटी रस्त्यावर भाजी विक्रेता महेश कांबळे याचा खून करण्यात आला होता. मृत कांबळे याच्याकडे संशयित मुजाहीद याचे वडील फिरोज शेख काम करत होते. त्यांनी कांबळे याच्याकडुन पैसे उसने घेतले होते. त्यातून कांबळे फिरोज शेख यांना मारहाण करत होता.
याच कारणातून कांबळे याने 2021 मध्ये फिरोज शेख यांचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो जामीनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. कांबळे याचे संशयित मुजाहीद याच्या नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधही होते. याचा राग मुजाहीद याला होता. गुरुवारी सकाळी कांबळे भाजी विक्रीसाठी शंभर फुटी रस्ता परिसरात नेहमीप्रमाणे आला होता. त्यावेळी मुजाहीद याने त्याचा मित्र जय याच्यासोबत मिळून कांबळे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर ते तेथून निघून गेले.
त्या घटनेनंतर शहर पोलीस तसेच एलसीबीचे पथक संशयितांचा शोध घेत होते. त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे यांना दोघे संशयित इनाम धामणी परिसरात लपल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आले.
सांगली शहरचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिलडा, शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदिप पाटील, सतिश लिंबळे, सिकंदर तांबोळी, विनायक शिंदे, रफिक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदिप कोळी, प्रशांत पुजारी, विशाल कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.