Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निलेश चव्हाणनं लपवली धक्कादायक माहितीपिस्तुल परवान्याची तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांनीच काढली ऑर्डर

निलेश चव्हाणनं लपवली धक्कादायक माहिती
पिस्तुल परवान्याची तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांनीच काढली ऑर्डर

पुणे : खरा पंचनामा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी नेपाळमधून अटक करण्यात आलेल्या आरोपी नीलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली आहे. याचदरम्यान, चव्हाणच्या पिस्तुल परवान्याबाबत खळबळजनक माहिती समोर येत आहे.

गृह विभागाकडे झालेल्या सुनावणीदरम्यान, त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांपासून लपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी आधी नाकारलेला अर्ज मंत्र्यांच्या सुनावणीनंतर मंजूर झाला आणि चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला.

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी सासरचं संपूर्ण हगवणे कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. त्यानंतर हगवणे कुटुंबाचे एकापाठोपाठ एक प्रकरणं समोर येऊ लागली आहे. यातच काही दिवसांपूर्वी बंदुक मिळवण्यासाठी हगवणेंनी वास्तव्याचा खोटा पत्ता दिला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर निलेश चव्हाण याच्या पिस्तुल परवान्याचीही आता चौकशी सुरू करण्यात आली होती.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अटकेत असलेल्या निलेश चव्हाणने पिस्तूल परवान्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र, पोलिसांकडून त्याचा हा अर्ज सुरक्षेचं कारण पुढे करत फेटाळला गेला होता. यानंतर चव्हाणनं गृह विभागात अपील केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासमोर पिस्तुल परवान्यासाठी सुनावणी पार पडली आणि चव्हाणला संबंधित परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडे निलेश चव्हाणला पिस्तुल परवाना देण्यासाठी सरकार दरबारी घडामोडींना वेग आला असतानाच वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर बलात्कार व इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती गृह विभागाला देणे आवश्यक असतानाही पुणे पोलिसांनी ती दडवली आणि परवाना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली. माहिती दिली असती, तर कदाचित हा पिस्तुल परवाना रद्दही करण्यात आला असता.

तसेच निलेश चव्हाणबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर यते आहे. त्याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांशी असलेलं कनेक्शनही वापरल्याची चर्चा आहे. मात्र, चव्हाणला गृह विभागाच्या आदेशानंतरच पुणे पोलिसांनी चव्हाणला परवाना मंजूर केल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यामुळे चव्हाणच्या पिस्तुल परवान्याबाबत पोलिस आणि प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.