पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या संशयिताला दोन तासात पकडला
मिरज रेल्वे स्टेशनवर इस्लामपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर येथील शेतमजूर महिलेच्या खुनातील संशयित शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यातून पळाला होता. सांगलीतील राजवाडा चौकात ही घटना घडली. त्यानंतर इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी तातडीने सूत्रे फिरवली. आणि इस्लामपूर पोलिसांच्या टीमने पोलीस अवघ्या दोन तासात मिरज रेल्वे स्टेशनवर त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मुवाज मुलाणी (रा. इस्लामपूर) असे पलायन केलेल्या संशयितचे नाव आहे. हाफिनजी मुल्ला (वय 65, रा. इस्लामपूर) या महिलेचा मंगळवारी मुवाज याने दागिन्यांसाठी कापूरवाडी येथील ओढ्यात डोक्यात दगड घालून खून केला होता. त्याला अटकही करण्यात आली होती.
शुक्रवारी त्याला सांगलीतील जिल्हा कारागृहात दाखल करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन सांगलीत आले होते. मात्र कारागृहात दाखल करण्यासाठी अडथळा आल्याने त्याला घेऊन जात असताना त्याने राजवाडा चौकातून सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले. त्यानंतर पोलिसांची विविध पथके त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली होती.
असा सापडला पळालेला संशयित
इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी तातडीने सूत्रे फिरवली. मुवाजने पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यानंतर थेट मिरज रेल्वे स्टेशन गाठले. तेथून त्याने इस्लामपूर येथील एकाशी फोनवरून संपर्क साधला. निरीक्षक हारूगडे यांना याची माहिती मिळताच त्यांनी इस्लामपूरमधील त्या व्यक्तीकडे कसून चौकशी केल्यावर त्याने मुवाज मिरज रेल्वे स्टेशनवर असल्याचे सांगितले. निरीक्षक हारूगडे यांनी तातडीने सांगलीतील त्यांच्या टीमला याची माहिती दिली. त्यानंतर सांगली ग्रामीणचे मनोज वाघमोडे, इस्लामपूर पोलीस ठाण्याचे तौसिफ़ मुलाणी यांच्यासह इस्लामपूर पोलिसांच्या टीमने मुवाजला मिरज रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.