Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस स्टेशनमध्येच 3 तरुणांचा अनैसर्गिक लैंगिक छळ? उपनिरीक्षक निलंबित

पोलीस स्टेशनमध्येच 3 तरुणांचा अनैसर्गिक लैंगिक छळ? 
उपनिरीक्षक निलंबित

जळगाव : खरा पंचनामा

जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणासंदर्भात चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलेल्या तीन तरुणांना पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाहेडा याने अमानुष मारहाण करत कपडे काढून परस्परांशी अनैसर्गिक लैंगिक चाळे करण्यास भाग पाडले आणि त्यांचा अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणांनी केला आहे. या गंभीर आरोपांनंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाहेडा यांनी तीन तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. आरोपानुसार, नाहेडा यांनी या तरुणांना कपडे काढायला लावले, त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर परस्परांशी अनैसर्गिक लैंगिक चाळे करण्यास भाग पाडले. हा प्रकार अतिशय गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पाऊल उचलत पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाहेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस अधिकाऱ्याच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.

या घटनेनंतर विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, केवळ निलंबनावर न थांबता, सदर पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाहेडा यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा पार्श्वभूमीवर, त्यांच्याकडून पुन्हा अशा प्रकारचा गैरवर्तन झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.