माणिकराव कोकाटे सभागृहात 42 सेकंद नाही, तब्बल 22 मिनिटं रम्मी खेळले?
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात ते विधानसभेत बसून मोबाइलवर 'रम्मी' गेम खेळताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) हँडलवर पोस्ट केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली होती. विरोधकांनी कोकाटेंवर टीकेची झोड उठवली होती. याप्रकरणी आता एक मोठा ट्विस्ट आला आहे.
आमदार रोहित पवार यांनी नुकतंच एक नवीन ट्वीट करत या संपूर्ण प्रकाराबाबत विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल शेअर केला आहे. या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, कृषीमंत्री कोकाटे केवळ काही सेकंद नव्हे, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे सभागृहात असताना मोबाईलवर पत्त्यांचा खेळ (रम्मी) खेळत होते. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमीभाव, खेळा रम्मी ! असा संतप्त टोला विरोधकांनी लगावत, सरकारवरही प्रश्नांची सरबत्ती केली. आता याच प्रकरणावर विधानमंडळाचा चौकशी अहवाल समोर आला असून, परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
रोहित पवारांनी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला आहे, सरकार आता तरी खुलासा करणार का? जर इतकं गंभीर प्रकरण असताना सरकार कारवाई करणार नसेल, तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा, तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण यांचा विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार आहे का?
चौकशी अहवालामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर दबाव वाढला असून, या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सभागृहासारख्या गंभीर आणि शिस्तबद्ध वातावरणात मंत्री पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा आरोप केवळ राजकीय नव्हे, तर नैतिकदृष्ट्याही गंभीर आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.