अडीच हजारांची लाच घेतानाकोतवालास अटक; तलाठ्यावरही गुन्हा दाखल
सांगली एसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
खरेदी केलेल्या प्लॉटची सात - बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी आणि स्वत:करिता २ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना बेळंकी (ता. मिरज) येथील कोतवालास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवार दि. ३ रोजी बेळंकी येथील तलाठी कार्यालय परिसरात करण्यात आली. याप्रकरणी तलाठ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांनी दिली.
तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण (वय ५०, रा. फ्लॅट क्र. १०४, रघुकुल अपार्टमेंट, ब्राह्मणपुरी, मिरज) आणि कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे (वय ५३, रा. बौध्द मंदिरानजीक, बेळंकी, ता. मिरज ) या दोघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या भावाने प्लॉट खरेदी केला होता. सात - बारा उताऱ्यावर त्याची नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी कोतवाल राजाराम वाघमारे याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी वाघमारे याने तलाठी विद्यासागर चव्हाण याच्याकडून नोंद करुन घेण्यासाठी स्वत: आणि तलाठी यांच्याकरिता २ हजाार ५०० रुपयांची मागणी केली. याबाबत दि. २ जुलै रोजी तक्रारदार यांनी याबाबतचा तक्रार अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिला होता. त्यानुसार पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता असल्याचे निदर्शनास आले.
गुरुवार दि. ३ रोजी पथकाने बेळंकीच्या तलाठी कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तलाठी विद्यासागर चव्हाण यांच्या कार्यालयासमोर तक्रारदार यांच्याकडून २ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कोतवाल वाघमारे यास रंगेहाथ पकडले. पथकाने केलेल्या चौकशीत, तक्रारदार यांच्या भावाच्या प्लॉटची सात - बारावर नोंद होण्यासाठी तलाठी विद्यासागर चव्हाण याने तक्रारदार यांना लाचेची रक्कम संशयित कोतवाल राजाराम वाघमारे याला देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे. दोघांवरही मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपअधिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक विनायक भिलारे आणि किशोर खाडे, ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, उमेश जाधव, सीमा माने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.