Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'महाराष्ट्र विधानसभे'ला 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधी यांचा पुन्हा आरोप

'महाराष्ट्र विधानसभे'ला 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधी यांचा पुन्हा आरोप

नवी दिल्ली : खरा पंचनामा

बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेरतपासणी मोहिमेला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीने आज संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच संसदेत आक्रमक घोषणाबाजी करून लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी देशात निवडणुकीची चोरी सुरू असल्याचा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत 'मॅच फिक्सिंग' झाल्याचा पुन्हा एकदा आरोप केला.

संसद अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांनी कालही संसदेबाहेर निदर्शने करून बिहारच्या मतदार यादी पडताळणीला विरोध दर्शविला होता. तसेच पुन्हा निदर्शने करण्याचा इशाराही दिला होता. त्यापार्श्वभूमीवर आज 'इंडिया' आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी काळे कपडे परिधान करून संसदेचे प्रवेशद्वारे असलेल्या मकरद्वारावर निदर्शने केली.

यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियांका गांधी-वद्रा, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, द्रमुकचे टी. आर. बालू, कनिमोळी, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राष्ट्रीय जनता दलाच्या मिसा भारती, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, झारखंड मुक्ती मोर्चासह अन्य विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले.

मतदारयादी पडताळणी विरोधातील घोषणा फलक घेऊन या खासदारांनी निदर्शने केली आणि लोकशाही बचाव, राज्यघटना बचाव अशा जोरदार घोषणाही देत बिहारमधील मतदार पडताळणी प्रक्रिया थांबवण्याचे आवाहनही केले.

पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की देशात निवडणुकीची चोरी केली जात असून हे सत्य आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारे मॅच फिक्सिंग झाली होती, आपण हे सर्वांना दाखवले. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एका जागेची तपासणी केली. तिथे मतांची चोरी आढळली. ती लवकरच जनतेसमोर आणली जाईल.

बिहारमध्ये 'एसआयआर'च्या नावाखाली अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांच्या मतांची चोरी सुरू आहे. मात्र आम्ही गप्प बसणार नाही. 'इंडिया' आघाडी लोकाधिकाराची लढाई संसदेपासून ते रस्त्यापर्यंत लढेल, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की आयोग बिहारमध्ये मतदानावर बंदी घालत असून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या संमतीनेच हे सुरू आहे.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांनी बिहारमधील मतदार यादी फेरतपासणीच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ घातल्याने संतप्त झालेल्या लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना फटकारले. विरोधक रस्त्यावरचे वर्तन संसदेत करत आहात. हे संपूर्ण देश पाहत आहे. सदनात फलक घेऊन येणाऱ्यांविरुद्ध निर्णायक कारवाई करावी लागेल, असा इशाराही दिला.

संसद गौरवशाली लोकशाहीची सर्वोच्च संस्था आहे. खासदारांचे संसदेतील वर्तन, आचरण आणि कार्यपद्धती मर्यादेत असावे. जनतेने त्यांच्या आवाजासाठी, त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी खासदारांना पाठवले आहे, असे ओम बिर्ला म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.