Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"... म्हणूनच पक्षाने माझ्यावर उपकार केलेत असं मी मानतो"

"... म्हणूनच पक्षाने माझ्यावर उपकार केलेत असं मी मानतो"

मुंबई : खरा पंचनामा

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीयमंत्री, दिग्गज नेते अन् पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर रविंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा सर्वसामान्य पोहचवण्यासाठी काम करावे, असे आवाहन केले. शिवाय, पक्षाने आपल्यावर कसे उपकार केले हे देखील त्यांनी सांगितले.

रवींद्र चव्हाण म्हणाले, "आज माझी या पदावर जी निवड झाली आहे, खरंतर पक्षाने माझ्यावर उपकार केले आहेत असं मी मानतो. माझ्यासोबत काम करणाऱ्या त्या त्या वेळच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे. माझी ओळख ही भाजप आहे. मी काय होतो आणि त्या वेळचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्रमुख पदावर माझ्या सारख्या एका छोट्याशा आणि एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला बसवलं गेलं. त्यामुळेच हे माझ्यावर उपकार आहेत."

तसेच "या पक्षाने मला मोठं केलं आहे. या पक्षाच्या सन्मानासाठी वाटेल ते करण्याची हिंमत माझ्यात आहे. हे मी कदापि विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही. भाजपची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आणि प्रभावी आहे. या विचारधारेला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे." असंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

याशिवाय, "२०१४च्या अगोदरचा काळ देशातील सर्वांनी आठवला पाहिजे आणि त्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार असेल किंवा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार हे आपण सर्वजण बघत आहोत. ही मंडळी दिवसरात्र पाहत नाही, २४ तासांपैकी १८ तास काम करतात. केवळ देशातील प्रत्येक घटकास न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे. जबाबदारी इतर कोणत्याही पक्षावर नाही. तर जबाबदारी ही आपल्याच पक्षावर किंवा आपल्याच कार्यकर्त्यांवर आहे. आपलाच कार्यकर्ता हे सर्व करू शकतो. देशातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहचण्याचं काम जर कुणी केलं असेल, तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो. असे कार्यकर्ते भाजप व्यतिरिक्त कोणत्याही पक्षात नाहीत, हे मला अभिमानाने सांगावं वाटतं. म्हणूनच आपल्या सर्वांना एक वाहक म्हणून काम करायचं आहे, आपली विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली पाहिजे." असंही चव्हाण म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.