कोल्हापुरातील बंड शमलं !
उद्धव ठाकरेंच्या फोननंतर संजय पवार मातोश्रीवर
कोल्हापूर : खरा पंचनामा
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी महाराष्ट्रात खळबळ माजवली असताना, कोल्हापुरात मात्र अंतर्गत बंडाची ठिणगी पडली होती. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी पक्षातील नाराजीमुळे उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता, आणि त्यांना शिंदे गटाकडून खुली ऑफरही मिळाली होती.
पण उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर आणि सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने पवार यांची नाराजी दूर झाली आहे. आता बुधवारी दुपारी 12:30 वाजता संजय पवार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून, यावेळी कोल्हापूरच्या राजकारणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती झाल्याने संजय पवार नाराज झाले होते. ही नियुक्ती करताना पक्षाने आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप करत पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांनी स्पष्ट केलं होतं की, ते शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंसोबत राहतील, पण पक्षातील अपारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
पवार म्हणाले, "1990 पासून मी शिवसेनेसाठी एकनिष्ठपणे काम केलं. मातोश्रीचे आदेश पाळले. पण गेल्या 10 वर्षांत पक्षात काही वेगळं घडलं. जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासली गेली नाही. विधानसभा निवडणुकीत षडयंत्र झालं. मधुरीमाराजे यांनी अचानक माघार का घेतली?"
पवार यांच्या नाराजीनंतर शिंदे गटाने संधी साधली. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पवार यांना जाहीरपणे पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र, ठाकरे गटाने तातडीने हालचाली केल्या. सुनील प्रभू यांनी पवार यांच्याशी चर्चा केली, आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पवार यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत पवार यांची नाराजी दूर झाली, आणि त्यांनी पुन्हा ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी होणाऱ्या मातोश्रीवरील भेटीत संजय पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोल्हापूरच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसह पक्षातील अंतर्गत समन्वयावरही यावेळी लक्ष केंद्रित होईल. पवार यांच्या नाराजीनंतर ठाकरे गटाने दाखवलेली तत्परता आणि पवार यांचा पुन्हा पक्षाशी जोडला जाणे, यामुळे कोल्हापूर शिवसेनेत एकीचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हं आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.