मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष सुटकेविरुद्ध महाराष्ट्र एटीएसची सुप्रीम कोर्टात धाव, गुरुवारी सुनावणी
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील 2006 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केलेल्या 12 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याची गरज असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या अपीलाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी यावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यायची की नाही आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी कोणत्या दिशेने जाईल, हे न्यायालय ठरवेल. याशिवाय, महाराष्ट्र सरकारच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सोमवारीच बॉम्बे उच्च न्यायालयाने 2006 च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 दोषींना निर्दोष मुक्त केले. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र एटीएसच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आरोपींची अत्यंत अमानवी आणि क्रूर पद्धतीने चौकशी करण्यात आली होती, असे न्यायालयाने म्हटले. त्यावेळी एटीएस अधिकारी हताश होते आणि याच कारणामुळे त्यांनी आरोपींकडून जबरदस्तीने कथित कबुलीजबाब घेतले होते जे कायदेशीरदृष्ट्या योग्य नव्हते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आता महाराष्ट्र एटीएसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा कायदेशीर महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी होणारी सुनावणी या प्रकरणाची पुढील दिशा ठरवेल आणि न्यायव्यवस्थेतील या गुंतागुंतीच्या लढाईत काय निर्णय लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.