कोकाटेंच्या मंत्रिपदावर आज फैसला; अजितदादाचं धुळ्यात भेटीचं फर्मान
मुंबई : खरा पंचनामा
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घातलेल्या घोळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे इथं निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांची, मंत्री कोकाटे सोमवारी (ता. 28) मुंबईत भेट घेणार होते.
परंतु अजितदादांनी मंत्री कोकाटेंना धुळे इथं आज (ता. 24) होणाऱ्या पक्षीय कार्याक्रमात सहभागी व्हा, तिथं काय निर्णय घ्यायचा घेऊ, अशा थेट सूचना केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोकाटेंनी घातलेल्या घोळाचा अन् त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय धुळ्यात अजितदादा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुढे आणला. यावरून मंत्री कोकाटेंविरोधात राज्यभर वातावरण तापलं आहे. याचा जाब विचारण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे छावाचे कार्यकर्ते गेले असताना, तिथं सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली. यामुळे राष्ट्रवादीसह मंत्री कोकाटेंविरोधात राज्यात शेतकऱ्यांसह विरोधकांकडून निदर्शने सुरू आहेत.
मंत्री कोकाटे हा घोळ निस्तरण्याऐवजी तो वाढताना दिसत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्यावर नाराज झाले आहे. त्यामुळे हा घोळ निस्तरण्यासाठी काल बुधवारी मंत्री कोकाटे मुंबईत जाणार होते. परंतु मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूर, तर उपमुख्यमंत्री अजितदादा पुणे दौऱ्यावर होते. त्यामुळे मंत्री कोकाटे यांनी मुंबईचा दौरा सोमवार (ता. 28) ढकलला. परंतु अजितदादांनी त्यांना आज (ता. 24) धुळे इथं होणाऱ्या पक्षीय कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहेत.
मंत्री कोकाटे यांची आक्षेपार्ह विधाने आणि वादग्रस्त वर्तणुकीमुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज आहेत. दोघांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाली असून पवार यांनी त्यांना चांगलेच सुनावल्याचेही समजते. विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यानंतर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर आगपाखड केली. त्याचवेळी एक रूपयात पीक विमा योजनेच्या संदर्भात आपल्या आधीच्या वादग्रस्त विधानाचे स्पष्टीकरण देताना त्यांनी राज्य सरकारबाबत वादग्रस्त वक्तव्य करून आणखी एक वाद ओढवून घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.