भाजपच्या बड्या नेत्यावर 'अॅट्रॉसिटी'चा गुन्हा
नाशिक : खरा पंचनामा
नाशिक बाजार समितीचे माजी सभापती व भाजप नेते शिवाजी चुंभळे यांच्याविरोधात शुक्रवारी (ता.11 जुलै) वाडीवर्हे (इगतपुरी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी समाजाच्या नागरिकाला त्याच्या जमिनीतून हाकलून देण्याचा प्रयत्न चुंभळे त्यांनी केला. त्यांच्यासोबत असलेल्या सात-आठ जणांनी मारहाण केली.
नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या आणि विविध कारणानं सातत्याने चर्चेत असलेल्या शिवाजी चुंभळे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
शिवाजी चुंभळे हे दोन दिवसांपूर्वी सारोळे (इगतपुरी) येथील भाऊसाहेब तांबडे यांच्या शेतावर गेले होते. त्यावेळी श्री तांबडे हे आपल्या वडिलोपार्जित शेतात काम करत होते. तिथे गेल्यावर चुंभळे यांनी हा गैरप्रकार केला. हा प्रकार घडल्यावर श्री तांबडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करण्यास विलंब केला.
नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी तांबडे यांना तू या जमिनीतून निघून जा. ही जमीन मी तुझ्या बहिणीकडून खरेदी केली आहे, असे सांगत दमबाजी केली. यावेळी तांबडे यांनी ही आमची वडीलोपार्जित जमीन आहे. तुम्ही खरेदी केली असेल तर कागदपत्र दाखवावेत, असे सांगितले.'
त्याचा राग आल्याने चुंभळे यांनी तांबडे यांना जातिवाचक अपशब्द वापरत शिवीगाळ केली. चुंभळे यांच्याबरोबर असलेले गणेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चौधरी, रतन नवले आणि अन्य सात ते आठ जणांनी तांबडे यांना दमबाजी करीत मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.