'वादग्रस्त विधानं, कृती खपवून घेणार नाही'
मुंबई : खरा पंचनामा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० मिनिटे मंत्र्यांचा क्लास घेतला. इथून पुढे वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला आहे. असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी असून काय कारवाई करायची ती करूच. पण आता एकही प्रकार खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना तंबी दिली आहे.
ही बैठक २० मिनिटे चालली. ही केवळ मंत्र्यांसाठी बैठक घेण्यात आली. काही मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि कृतीमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत प्रचंड नाराजी व्यक्त केली.
कृषिमंत्री कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर वादात सापडलेल्या कोकोटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी वादग्रस्त विधाने आणि कृती करणाऱ्या मंत्र्यांना बैठकीत सक्त ताकीद दिली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आज सकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विधानपरिषदेत वादग्रस्त वक्तव्ये आणि सभागृहात रमी खेळल्याच्या प्रकरणावरून कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कोकाटे यांच्यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत असून बोलताना आणि वागताना भान ठेवायला हवे, अशा शब्दांत अजित पवारांनी कोकाटेंना सुनावले.
कलंकित, भ्रष्टाचारी, असंवेदनशील मंत्री, आमदारांच्या बडतर्फची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेच्यावतीने सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून मंत्री संजय शिरसाट, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्य मंत्री योगेश कदम, संजय राठोड, तसेच मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.