केरळच्या नर्स निमिषा प्रिया यांची फाशी स्थगित
भारत सरकारच्या प्रयत्नांना यश
नवी दिल्ली : खरा पंचनामा
केरळच्या नर्स निमिषा प्रिया, जी सध्या येमेनमधील तुरुंगात मृत्युदंडाची शिक्षा भोगत आहे, हिच्या फाशीची अंमलबजावणी सध्या स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती निमिषा प्रिया अॅक्शन कौन्सिलने जाहीर केली असून, तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे.
निमिषा प्रिया हिला येमेनमधील एका नागरिकाच्या खूनप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. १६ जुलै २०२५ रोजी फाशी देण्याची तारीख निश्चित झाली होती. मात्र, आज झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये ही फाशी स्थगित करण्यात आली आहे.
भारत सरकारने या प्रकरणात सुरुवातीपासूनच शक्य ते सर्व सहकार्य केले असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारने विशेष प्रयत्न करून निमिषाच्या कुटुंबीयांना आणि संबंधित पक्षाला परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी वेळ मागितला होता.
"निमिषा प्रिया यांच्या प्रकरणात येमेनमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी १६ जुलै रोजी होणारी फाशी स्थगित केली आहे. भारत सरकारच्या अधिकारी वर्गाने स्थानिक तुरुंग प्रशासन व सरकारी वकिलांशी सतत संपर्कात राहून ही स्थगिती मिळवण्यात यश मिळवले आहे."
येमेनचे मानवी हक्क कार्यकर्ते सॅम्युअल जेरो यांनी देखील या स्थगितीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, "आज झालेल्या चर्चेनंतर फाशीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." येत्या काही दिवसांत कुटुंब आणि स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये आणखी वाटाघाटी होणार आहेत.
निमिषा प्रिया ही केरळमधील नर्स असून ती कामानिमित्त येमेनमध्ये गेली होती. तेथे तिच्या एका स्थानिक नागरिकासोबत वाद झाला आणि त्यानंतर त्या नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. न्यायालयाने तिला खूनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.
या प्रकारात 'ब्लड मनी' (पिडीत कुटुंबाला नुकसानभरपाई देऊन माफीनामा घेण्याची प्रक्रिया) लागू शकते. निमिषाच्या कुटुंबीयांना त्यासाठी वेळ मिळावा, म्हणून भारत सरकारने फाशी स्थगित करण्याचा आग्रह धरला होता.
यापुढे येमेनमधील न्यायालय आणि पीडित कुटुंबाच्या सहमतीने तोडगा काढण्याचे प्रयत्न होतील. भारत सरकार आणि निमिषाच्या कुटुंबीयांकडून 'ब्लड मनी' संकलन आणि माफीसाठी चर्चा होईल. फॉरेन्सिक, पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया यांचाही आढावा घेण्यात येईल.
निमिषा प्रिया हिला मिळालेली ही स्थगिती तत्काल फाशीपासून वाचवणारी आणि न्यायासाठी लढणाऱ्या संघटनांना आशेचा किरण देणारी आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, भारत सरकारकडून उच्च पातळीवर प्रयत्न सुरू राहणार आहेत.
ही केस केवळ एका भारतीय महिलेचा जीव वाचवण्यापुरती मर्यादित नसून, जागतिक स्तरावर भारताच्या मानवाधिकार व न्यायनितीच्या भूमिकेचं प्रतिबिंबही आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.