होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचाराची परवानगी रद्द
राज्य सरकारचा दणका!
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी पद्धतीने उपचार करण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने 30 जून रोजी एक निर्णय घेतला होता. तो अखेर IMA अन् अन्य वैद्यकीय संघटनांच्या तीव्र विरोधानंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता BHMS डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधे लिहून देण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
पूर्वी CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना मराठवाडा मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करून काही प्रमाणात अॅलोपॅथी औषधे लिहिण्याची मुभा दिली जात होती. मात्र, IMA आणि इतर संघटनांनी याला जोरदार विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की, एमबीबीएस आणि CCMP यामधील शैक्षणिक दर्जामध्ये मोठा फरक असून, रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
IMA च्या म्हणण्यानुसार, अशा निर्णयामुळे ना केवळ रुग्णांचे आरोग्य धोक्यात येईल, तर अॅलोपॅथी डॉक्टरांच्या व्यावसायिक अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आता 15 जुलैपासून सुरू होणारी नवीन CCMMP नोंदणीही तात्पुरती थांबवली आहे.
या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना आता अॅलोपॅथी औषधे लिहिण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार मिळणार नाही. यानंतर जर त्यांनी अशा प्रकारचा उपचार केला, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.