कल्याणमधील साखर विक्रेत्याची सांगलीच्या व्यापाऱ्याकडून २४ लाखाची फसवणूक
कल्याण : खरा पंचनामा
कल्याणमधील एका साखर विक्रेत्याची सांगलीच्या बाजार समिती (मार्केट यार्ड) आवारातील एका साखर पुरवठादार विक्रेत्याने २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी कल्याण मधील साखर विक्रेत्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दानिश निजाम सैय्यद (३१) असे फसवणूक झालेल्या कल्याणमधील साखर विक्रेत्याचे नाव आहे. ते दूधनाका भागात राहतात. मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. तक्रारदार दानिश सैय्यद हे साखरेचे घाऊक विक्रेते आहेत. मार्चमध्ये व्यापारी दानिश सैय्यद यांनी सांगलीच्या बाजार समिती आवारातील एका घाऊक साखर पुरवठादाराकडे ५० लाख टन साखरेची मागणी नोंदवली होती. या मागणीच्या बदल्यात आगाऊ रक्कम म्हणून दानिश सैय्यद यांनी पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याच्या गणेश शुगर्स या आस्थापनेच्या बँक खात्यावर ऑनलाईन माध्यमातून १६ लाख रूपये पाठविले होते. पहिल्या टप्प्यात २५ टन साखरेचा पुरवठा करावा. त्यानंतर उर्वरित मागणीचा पुरवठा करावा असे दोन्ही व्यापाऱ्यांमध्ये ठरले होते. दुसऱ्या टप्प्यात दानिक सैय्यद यांनी सांगलीच्या व्यापाऱ्याच्या बँक खात्यावर दुसऱ्यांदा आठ लाख २५ हजार रूपये ऑनलाईन माध्यमातून साखर पुरवठ्यासाठी जमा केले.
मार्चमध्ये साखरेची मागणी नोंदवुनही सांगलीचा व्यापारी साखरेचा पुरवठा करत नव्हता. या पुरवठ्यासाठी कल्याणचा व्यापारी सतत तगादा लावत होता. सांगलीच्या व्यापाऱ्याकडून विविध कारणे दिली जात होती. पाच महिने होऊनही सांगलीचा व्यापारी साखरेचा पुरवठा करत नव्हता. त्यामुळे कल्याणच्या व्यापाऱ्याने आपण दिलेली २४ लाख २५ हजार रूपयांची रक्कम आपणास परत करावी म्हणून सांगलीच्या व्यापाऱ्याच्या मागे तगादा लावला. सांगलीच्या साखर पुरवठादार व्यापाऱ्याने कल्याणच्या व्यापाऱ्याला खाडाखोड केलेले धनादेश दिले. हे धनादेश बँकेत जमा केल्यावर ते वटले नाहीत. त्यामुळे बँक खात्यात पुरेशी रक्कम नसताना सांगलीच्या व्यापाऱ्याने आपणास त्या खात्याचे धनादेश देऊन आपली फसवणूक केली. तसेच आपण मार्चमध्ये नोंदविलेल्या ५० टन साखरेचा पाच महिन्याच्या कालावधीत पैसे देऊनही पुरवठा केला नाही. त्यामुळे साखर नाहीच, पण आपण दिलेले पैसेही सांगलीच्या बाजार समितीमधील (मार्केट यार्ड) साखरेचा व्यापारी परत करत नाही. तो आपली आर्थिक पसवणूक करत आहे हे लक्षात आल्यावर कल्याणचे व्यापारी दानिश सैय्यद यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड याप्रकरणाचा तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.