Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार!

एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार!

मुंबई : खरा पंचनामा

राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. बुधवारी रात्री ते दिल्लीला गेले असून शिंदे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.

शिंदेंच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. नियोजित कार्यक्रम सोडून एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

माहितीनुसार, एकनाथ शिंदे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असून यात विविध महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. त्यात नुकतेच शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला केलेल्या मारहाणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज असल्याचे बोलले जाते. विधान परिषदेत हा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी या प्रकाराची दखल घ्यावी आणि यावर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घ्यावा अशी शिफारस केली आहे.

दुसरीकडे राज्यात ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. तब्बल १८ वर्षांनी हे दोन्ही बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरणेही बदलण्याची चर्चा सुरू झाली. त्यात एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा दिल्याने विरोधकांनी त्यांना धारेवर धरले. मीरारोड येथे झालेल्या मराठी भाषिकांच्या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. याठिकाणी पोलिसांच्या दबावाला न झुकता मराठी माणूस एकवटल्याचे चित्र दिसून आले. या मोर्चात शिंदेसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक गेले असता त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सरनाईक यांना मराठी भाषिकांनी विरोध करताच त्यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला.

दरम्यान, ठाकरे बंधू एकत्रित येण्यामागे खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच असल्याचे माजी आमदार इम्तियाज जलील यांनी दावा केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांना वरचढ होऊ द्यायचे नाही त्यासाठी भाजपा प्रयत्न करतेय असं त्यांनी म्हटलं. तर मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांनीही जे बाळासाहेबांना जमले नाही, इतर कुणाला जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमले असा मार्मिक टोला लगावला होता. त्यामुळे राज्यात सुरू असणारा हिंदी विरुद्ध मराठी वाद यात सर्वाधिक कोंडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची झाल्याचे दिसून आले. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पहिली ते पाचवी हिंदी नको अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत असं म्हणणाऱ्या शिंदेसेनेच्या नेत्यांनी हिंदी सक्तीवर ठाम भूमिका घेणे टाळले अशी लोकांमध्ये चर्चा सुरू होती. राज्यातील एकंदर घडामोडी आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.