बीड, सांगलीनंतर आता धाराशिवमध्ये तिसरा 'आका'?
मुंबई : खरा पंचनामा
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारविरोधात प्रचंड आक्रमकता धारण केली आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशनकाळात सभागृहात कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे रम्मी खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल करत खळबळ उडवून दिली होती.
आमदार रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंना अडचणीत आणल्यानंतर महायुती सरकारवर सातत्यानं हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. अशातच आता आमदार रोहित पवारांनी शनिवारी (ता. 26) पुन्हा एकदा सरकारसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढवणारं नवं ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये बीड आणि सांगलीनंतर आता धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? असा सवाल सरकारला केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियाच्या X माध्यमावर ट्विट करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, बीड आणि सांगलीनंतर आता धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? असा सवाल धाराशिव मधील पवनचक्की कंपनीत झालेल्या तोडफोडीनंतर आमदार पवारांनी केला आहे.
तसेच महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होत असल्याचा गंभीर आरोपही रोहित पवारांनी या ट्विटमधून केला आहे. या त्यांच्या नव्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
रोहित पवारांनी यावेळी महाराष्ट्राचं गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही ? असा खडा सवालही उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणतात, 'महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होत असून पूर्वी पुण्यात दहशत माजवणाऱ्या एका आकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट धाराशीवपर्यंत मजल मारल्याचं पवार यांनी ट्विटद्वारे सांगितलं. त्याच्या टोळीने धाराशीवमध्ये पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करून धुमाकूळ घातलाय आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून प्रचंड दहशत माजवलीय. त्याच्या दहशतीमुळं कुणी तक्रार करायलाही पुढं येत नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
बीड आणि सांगलीनंतर आता धाराशीवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? आणि गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही? मुख्यमंत्री महोदय, पुलीस की इज्जत का सवाल है! कधी आवळताय या नवीन आकाच्या मुसक्या?' असा टोलाही रोहित पवारांनी या ट्विटमध्ये लगावला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात खंडणीसाठी पवनचक्की माफियांकडून दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच भाग म्हणून पवनचक्की कंपनीतील वाहनांची तलवारी, लोखंडी साखळ्या, धारदार शस्त्रांनी तोडफोड करत तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.