Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाढत्या गुन्हेगारीबाबत महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडतीखुनाच्या गुन्ह्यांची कारणमिमांसाचे उपाधीक्षकांनी विश्लेषण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना

वाढत्या गुन्हेगारीबाबत महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती
खुनाच्या गुन्ह्यांची कारणमिमांसाचे उपाधीक्षकांनी विश्लेषण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना

सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. श्रावण मास सुरू होणार असल्याने श्रावण मासातील सणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. खुनाच्या गुन्ह्यांची कारणमिमांसाचे उपधिक्षकांनी नी विश्लेषण करून त्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

बुधवारी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगली पोलीस घटकाची गुन्हे  आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत त्यांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत मार्गदर्शन केले.

महानिरीक्षक फुलारी म्हणाले, कारागृहातून सुटणारे गुन्हेगार तसेच शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांची माहिती सर्वच पोलीस ठाण्यांना कळवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याकरता तपासी अधिकारी यांची कार्यशाळा आयोजन करून सरकारी वकील यांचे मार्फत त्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

दाखल गुन्ह्यातील फिर्यादींना गुन्ह्यातील मुद्देमाल परत करण्याचे अभियान सतत राबवावे असे सांगून त्यांनी सात वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्याच्या घटनास्थळास फॉरेन्सिक एक्सपर्ट यांची भेट अनिवार्यपणे झालीच पाहिजे अशा सक्त सूचना दिल्या. अपहरण व अपनयन या गुन्ह्यातील पिढीताचा  प्राधान्याने शोध घ्यावा, असेही महानिरीक्षक फुलारी यांनी यावेळी सांगितले.

लवकरच श्रावण मास सुरू होणार असल्याने श्रावण मासातील सणांच्या दरम्यान व्हिजिबल पोलिसिंग ठेवावे गर्दीचे ठिकाणी छेडछाडविरोधी पथक, निर्भया पथक तैनात ठेवावीत अशा सूचना करून नागपंचमी सणाचे पार्श्वभूमीवर वनविभागासोबत संयुक्त नाकाबंदीचे आयोजन करण्यास त्यांनी सांगितले. बत्तीसशिराळा येथे पार पडणाऱ्या नागपंचमीचे सणाचे पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाचे  उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पार्श्वभूमीवर निवडणूक अनुषंगाने दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची दोषारोपपत्र दाखल झाले का तपासावे त्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे सांगून एक गाव एक गणपती योजना राबवण्यास प्रोत्साहन द्यावे. प्रदूषण मुक्त गणपती उत्सव संकल्पना राबवावी असेही महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.

आगामी सणाचे व निवडणुकांचे पार्श्वभूमीवर शांतता समिती व जातीय सलोखा समितीच्या बैठका आयोजित करा. मागील पाच वर्षातील हिंदू-मुस्लिम अनुषंगाने दाखल असणारे अदखलपात्र दखलपात्र गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आर्थिक फसवणूकीबाबतचे गुन्हे दाखल होण्यासाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत संबंधित उपाधीक्षकांनी लक्ष घालून या गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना महानिरीक्षक फुलारी यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्ह्यातील सर्व पोलीस उपाधीक्षक, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सर्व विभागाचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.