मुंबई लोकल स्फोट प्रकरणी आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली : खरा पंचनामा
मुंबईत लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींना निर्दोष सोडलं होतं. या निर्णयाला राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करताना निर्णयाला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, निर्दोष सुटका झालेल्यांना सध्या अटक केली जाणार नाही किंवा त्यांना पोलिसात हजर होण्याची आवश्यकता नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.
भारताचे अधिवक्ता तुषार मेहता यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडली. निर्दोष सोडलेल्यांना अटक करण्याची मागणी करत नाही. पण त्यांच्या निर्दोष मुक्ततेला स्थगिती द्यावी अशी विनंती आहे. उच्च न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत यामुळे प्रलंबित खटल्यांवर परिणाम होऊ शकतो.
मुंबई उच्च न्यायालयाने मकोका विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. मकोका विशेष न्यायालयाने मुंबई लोकल स्फोट प्रकरणात अटक केलल्या आरोपींना दोषी ठरवलं होतं. यापैकी पाच जणांना फाशीची आणि ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करत सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती. तपास आणि साक्षीपुराव्यांवर शंका उपस्थित करत न्यायालयाने एटीएस आणि तपास यंत्रणांना फटकारलं होतं.
मुंबईत ११ जुलै २००६ रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर ७ स्फोट झाले होते. सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पहिला स्फोट झाला. त्यानंतर पुढे ११ मिनिटात लागोपाठ ७ स्फोटांनी मुंबई हादरली होती. या स्फोटांच्या मालिकेत १८९ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तर ८२० जण जखमी झाले होते. यातील अनेकांना कायमचं अपंगत्व आलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.