नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान
CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट
पंढरपूर : खरा पंचनामा
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय पूजा थाटामाटात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे शासकीय पूजा संपन्न झाली.
या शासकीय पूजेचा मान यंदा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील शेतकरी दाम्पत्य कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मिळाला. या दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली. पूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उगले दाम्पत्याचा सत्कार केला. त्यांना सन्मानित केल्यानंतर उगले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांनी एक वर्षासाठी मोफत एसटी प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. उगले दाम्पत्य पुढील वर्षभर महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी बसने मोफत प्रवास करू शकतात.
महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शासकीय पूजेचा मान मिळणे ही प्रत्येक वारकऱ्याची स्वप्नवत बाब मानली जाते. यंदा हा मान मिळाल्याने उगले दाम्पत्य आनंदाने भारावले आहे. 'काय बोलावं, काहीच समजत नाही. खूप आनंद झाला आहे. आमचा नंबर लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशी भावना कैलास उगले यांनी व्यक्त केली.' तर, "फडणवीस साहेबांसोबत विठ्ठलाचं दर्शन आणि पूजा करण्याची संधी मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं. मी भगवंतासमोर आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे," असे म्हणत कल्पना उगले यांनी आपला आनंद व्यक्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.