खोक्या उर्फ सतीश भोसलेला बीड कारागृहातून हलवणार!
बीड : खरा पंचनामा
बीड जिल्हा कारागृहातील बेकायदेशीर कृत्यांमुळे कुख्यात झालेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याला छत्रपती संभाजीनगर येथील हरसूल कारागृहात हलवण्याचा महत्त्वाचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. खोक्याने कारागृहात गांजा आणून त्याच्या वाटणीवरून इतर कैद्यांशी वाद घातल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खोक्यासह चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्जही दाखल झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खोक्याला तातडीने हरसूल कारागृहात हलवण्यात आलं आहे.
शनिवारी (९ ऑगस्ट) सकाळी बीड जिल्हा कारागृहात एका अज्ञात व्यक्तीने रबरी चेंडूत गांजा भरून कारागृहात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा गांजा वाटपावरून सतीश भोसले उर्फ खोक्यासह चार न्यायाधीन कैद्यांमध्ये जोरदार राडा झाला.
यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत चेंडू ताब्यात घेतला, परंतु कैद्यांनी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या घटनेने बीड कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. खोक्या हाच या गांजा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात उघड झालं आहे.
खोक्याला वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात शिरूर कासार येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने १० ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याच्यावरील मारहाणीच्या दोन प्रकरणांमध्ये (दिलीप ढाकणे आणि बुलढाण्यातील एका व्यक्तीवरील हल्ला) जामीन मंजूर झाला नसल्याने तो कारागृहातच आहे. आता गांजा प्रकरणातील नव्या गुन्ह्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.